पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला

 पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला


भुईंज येथील 'केबीपी'च्या संचितचीही नंबरी कर्तबगारी


मूळ गाव धाराशिवकडचे. आई वडील पोटापाण्यासाठी पंधराएक वर्षांपूर्वी भुईंजमध्ये आलेले. ४  थी पर्यंत झेडपीच्या वारागडेवाडीतील शाळेत शिक्षण, ५ वी पासून १२ वी पर्यंत भुईंज येथील कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कुल व ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षण. याच दरम्यान २०१७ साली वडिलांचे निधन झाले. घरात आई, धाकटी बहीण आणि तो.


सुट्टीत काम करून घराला हातभार लावणे आवश्यकच, त्यामुळे खासगी क्लासचा विचारही करणे अशक्य. वर्गात शिकवले जाईल ते ध्यानात ठेवायचं, घरी येऊन कामातून वेळ मिळेल तसा अभ्यास करायचा.


अशा अनंत अडचणीच्या परिस्थितीत बिकट परिस्थितीवर मात करत संचित दत्तात्रय कसबे याने CET मध्ये

82.8615477 पर्सनटाइन मिळवले.


आजही वैशाली भट यांच्या पेट्रोल पंपावर काम करत असणाऱ्या या पोराची ही कर्तबगारी अनेकांसाठी आदर्शवत ठरावी अशीच.


कोणत्याही सुविधा नाहीत, की कसले लाड नाहीत. अभ्यासाला पुरेशी साधने नाहीत, की हौसेमौजेच्या कुठल्या वस्तू नाहीत. ना छानछोकिचे जीवन ना स्वतःचं हक्काचं छप्पर.


अशा परिस्थितीशी झगडत समाजाच्या शेवटच्या बिंदूवरील ही एवढुशी पोरं अडचणींचा पहाड फोडतात तेव्हा त्यांच्या ढोर मेहनतीतून साकारलेल्या या कर्तबगार यशाने  मन भरून येतं, त्यांनी केलेली कामगिरी आदर्श म्हणून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून इतरांना दाखवावी, सांगावीशी वाटते.


यंदा खासगी क्लासशिवाय भुईंज येथील केबीपीच्या अनेक विद्यार्थ्यांनी जो विक्रम केलाय त्या रत्नांमधील संचित हे एक रत्न अगदी लखलखतं.


काहीना कदाचित संचितचे गुण विशेष वाटणार नाहीत. मात्र त्याला ज्या शाखेत पुढची वाटचाल करायची आहे त्यासाठी ते पुरेसे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने ते जगण्यासाठी लढाई लढताना केलेल्या ढोरमेहनती सोबत केवळ कॉलेज मधील शिक्षकांचे मार्गदर्शन व सेल्फ स्टडीवर प्राप्त केलेत. त्यासाठी त्याचे व इतर अशा सर्व विद्यार्थ्याचे आणि त्यांच्या शिक्षकांचे कौतुक करावेच लागेल.


त्याच कौतुकातून,


अभिनंदन रे संचित. खूप खूप शुभेच्छा.

राहुल तांबोळी, भुईंज

Comments

Popular posts from this blog

भुईंज डेंजर झोनमध्ये

#ना खासगी क्लास ना पालकांना आर्थिक तोशीस, तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻