भुईंजच्या लेकींच्या चरणी अवघी पंढरी झाली लीन


 भुईंजच्या लेकींच्या चरणी अवघी पंढरी झाली लीन

भुईंज येथील सायकल वेडे ग्रुप विविध साहसी सायकल मोहिमांमुळे  महाराष्ट्राबाहेरही लौकीकप्राप्त आहे.

याच लौकिकात भर टाकणारी गोष्ट भुईंज ते पंढरपूर सायकलवारी मोहिमेत घडली.


सलग तिसऱ्या वर्षी भुईंजचे सायकल वेडे आपली सायकल दिंडी घेऊन पंढरपूरमध्ये पोहोचले. यावेळी ग्रीष्मा योगेश शिर्के ही चिमुरडी विठ्ठलाच्या तर ईश्वरी सुनील शेवते ही चिमुरडी रखुमाईच्या वेशात पंढरीत अवतरल्या. 


आणि काय सांगु देवा?


सारी पंढरी या बाल मनोहर विठू रखुमाईच्या प्रेमात पडली. सारी पंढरी ग्रीष्मा व ईश्वरीच्या भोवती गोळा झाली. अक्षरशः सर्व वारकरी, भक्त, आबालवृद्ध या विठू रखुमाईसमोर लोटांगण घालू लागले. 


*जेव्हा महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सायकलस्वारांची दिंडी नगरप्रदक्षनेला निघाली तेव्हा तर त्या मिरवणुकीत या दोघीना रथातच उभे केले, त्यांच्या भोवती समस्त सायकल स्वार व तमाम वारकऱ्यांनी रिंगण घातले.*


मिरवणूक संपली तरी वारकरी, भाविक या दोघींच्या बाजूने हटायला तयार नाहीत. अनेकांनी विनंती केली, की या दोघींना नाश्ता तरी करुद्या, त्यांनी सकाळपासून काही खाल्ले नाही. तर *उपस्थित भाविक वारकऱ्यांनी स्वतःच्या हातानेच ग्रीष्मा व ईश्वरीला भरवायला सुरुवात केली.* जणू काही विठू रखुमाई प्रत्यक्ष आपल्या हातून प्रसाद प्राशन करत आहेत ही भावना त्या सर्वामध्ये होती. ग्रीष्मा व ईश्वरीचे पोट तुडुंब भरले तरी आग्रह सुरूच. असं गुदमरून टाकणारे प्रेम त्याना लाभले.


भुईंजच्या या लेकींना पंढरीच्या हजारो भाविक, वारकऱ्यांचे जे अफाट प्रेम मिळाले त्यात उमेश परिचारक यांचाही समावेश होता. पंढरीच्या या नेत्यालाही या दोघींसोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही.


त्या अर्थाने सायकल वेड्यांची ही मोहीम ग्रीष्मा व ईश्वरीने विठू रखुमाईच्या रुपात गाजवली.


सागरच्या डोक्यात नेहमीच अफलातून कल्पना येतात. ही कल्पना त्याचीच. त्यासाठी मोहिमेपूर्वी अवघ्या काही वेळात तयारी करून हे सर्व साकारने आणि त्याला सर्वच सायकल वेड्यांची उत्स्फूर्त साथ लाभणे ही गोष्ट विशेष महत्वाची.


५ वीत शिकत असणाऱ्या ग्रीष्मा व ईश्वरी केवळ विठू रखुमाई झाल्या नाहीत तर त्यांनीही सायकलस्वार म्हणून या  मोहिमेत, सायकल वारीत सहभाग घेतला.


पर्यावरण जपण्याचा दहासूत्री संदेश देत पार पडलेल्या या मोहिमेत सागर दळवी, सुनील शेवते, योगेश शिर्के,अनिल लोखंडे, अवि नवले, गौरव जाधवराव, उत्कर्ष दळवी, हर्ष शेवते, निलेश दगडे हेही सहभागी झाले होते.


सर्वत्र या मोहिमेचे स्वागत होत असताना सुभद्रा पेट्रोलीयमचे अंकुश शिंदे यांचे व्यवसाय बंधू व माळशीरसचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील यांनीही मोरीची येथे या सर्वांचे भोजनासह उत्तम आदरातिथ्य केले. त्यावेळी किशोर सुळ यांनी मदनदादा भोसले यांच्याप्रति आदरभाव व्यक्त करीत, त्यांच्याशी असणाऱ्या स्नेहाला उजाळा दिला.


भुईंजच्या लौकिकात भर टाकणाऱ्या या तमाम सायकल वीरांचे अभिनंदन व पुढील मोहिमेसाठी शुभेच्छा.

राहुल तांबोळी, भुईंज

Comments

Popular posts from this blog

भुईंज डेंजर झोनमध्ये

पेट्रोल पंपावर कामाला.. तरीही CET मध्ये नंबराला

#ना खासगी क्लास ना पालकांना आर्थिक तोशीस, तरीही भुईंज येथील केबीपीच्या विद्यार्थ्यांची CET मध्ये विक्रमी कामगिरी 💪🏻💪🏻💪🏻